मारहाणीत जखमी झालेल्या 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; जामनेरमध्ये तणाव
जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील 21 वर्षे तरुणाला संशयित कारणावरून मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मुस्लिम समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला असून त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडी स्वतः जातीने तेथे उपस्थित आहे. त्याचबरोबर अतिरिक्त कुमक जामनेर शहरात मागवण्यात आलेली आहे.
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे राहणाऱ्या सुलेमान रहीम खान पठाण (वय 21) याने सकाळी आपल्या वडील व आजोबांसोबत शेतातील काम केले. यानंतर जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरून येतो असं सांगून तो घरातून निघाला. तिथून एका कॅफेवर असताना काही लोकांना त्याचा संशय आला आणि त्यांनी रहीमला बेदम मारहाण केली. जमावाने मारहाण करत त्याला बेटावद खुर्द या गावाच्या बाहेरील बस स्थानकाजवळ सोडून दिले. तशाच मार खालेल्या अवस्थेत व फाटलेल्या कपड्याने रहीम घरी पोहोचला व कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच तो भोवळ येऊन कोसळला.


त्याला घेऊन संध्याकाळी त्याचे नातेवाईक जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याघटनेची माहिती मिळताच मुस्लिम समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी पाच एसआरपीच्या तुकड्या पाठवण्यात आलेले आहेत व अतिरिक्त कुमकही त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. पोलिसांनी तपासणी यंत्रणा व तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते