पूजेसाठी होम पेटविताच घडला अनर्थ; मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू

0

अमळनेर । पूजा सुरु असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळोद येथे नदी काठावर बुधवारी दुपारी घडली. अमोल श्यामकांत शुक्ल (३८, रा. अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे नदी काठावर पुलाखाली जळोद येथील इसमाची उत्तरकार्याची पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाच्या वर असलेले मधमाशांचे पोळ फुटले. पूजेला बसलेल्यांना त्या चावल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले.

त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी इतरांना सांगितले की, पळू नका, खाली झोपून घ्या. त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच चावल्या. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

इतर पाच ते सहा जणांना देखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अमोल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.