IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांना गृहविभागाचा दणका; तीन कारागृहांचा कारभार काढला

0

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या कोठडीची हवा खात आहे. दरम्यान या प्रकरणात शशांक हगवणेचे मामा पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरही सातत्याने हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप होत असून याच दरम्यान गृहविभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे.

जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे. सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणे याचे मामा जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांनी याप्रकरणात हगवणे कुटुंबाला मदत केली असण्याची दाट शक्यता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली होती. मात्र सुपेकर यांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपला हगवणे कुटुंबाशी या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितले होते.

तर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील भूमिका स्पष्ट केली होती. सुपेकरांचा हगवणेला वाचवण्यात सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असं अजित पवार म्हणाले होते. यातच वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे म्हटले होते, मुलाच्या जन्मपत्रिकेत मामा म्हणून त्यांचे नाव आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेतल्याचे समोर आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.