जळगावमध्ये गुलाबी थंडीची चादर! पारा घसरला, थंडी आणखी वाढेल?
जळगाव । महाराष्ट्रातून पावसाने रजा घेतली असून यानंतर आता राज्यावर गुलाबी थंडीची चादर पसरली आहे. हवामान कोरडे झाले असून उत्तरेकडील थंड हवा महाराष्ट्राकडे आल्याने राज्याच्या किमान तापमनात घट होत आहे. दरम्यान जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाल्याने जळगावकरांना हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे.
शनिवारी धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे हंगामातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यांनतर जळगावमध्ये १०.८ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. परिणामी शहरात गारठा पसरला असून, येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


येणारा आठवडा राज्यात थंडीची लाट घेऊन येणारा ठरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वारे मध्य भारत तसेच महाराष्ट्राकडे वाहून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमान अचानक घटून थंडीला सुरुवात झाली.आज राज्याच्या कमाल व किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.