जळगावमधील अजित पवार गटाचे नेते विनोद देशमुखांना अटक
जळगाव । जळगाव शहारातील व्यवसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आलीय. या कारवाईने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांनंतर ही अटक झाली असून, देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जळगाव शहरातील व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या कार्यालयावर ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी अचानक हल्ला करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी संशयितांकडून वाणी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही देशमुख यांना अटक झालेली नव्हती.


या प्रकरणात व्यावसायिक तथा फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन, “अजित पवार यांच्या दबावामुळे पोलिस अटक करत नाहीत,” असा गंभीर आरोप केला होता. वाणी यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. विनोद देशमुख यांना अटक केल्यानंतर दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अटकेमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नेत्यावर ही कारवाई झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढण्याची शक्यता आहे.