उष्णतेच्या लाटेचा वाढता प्रभाव; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

0

जळगाव | मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे, तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS), लिंबूपाणी, ताक, लस्सी व फळांचे रस यांसारख्या पेयांचा वापर करावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे व भाज्या आहारात समाविष्ट करावीत.

तसेच, पातळ, सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. बाहेर जाताना डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करावा. शक्यतो सकाळी व संध्याकाळीच बाहेरील कामांचे नियोजन करावे. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळावे. हवामानविषयक अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर माहिती घ्यावी, तसेच रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांमधील सूचना लक्षात घ्याव्यात.

लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, घराबाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर नियमित लक्ष ठेवावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटरचा वापर करावा व रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शरीर थंड ठेवण्यासाठी पंखा, ओलसर कापड, स्प्रे किंवा बर्फाचा वापर करावा.

दरम्यान, दुपारच्या वेळेत कठोर परिश्रम टाळावेत, अनवाणी बाहेर जाऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन टाळावे. उष्णतेच्या काळात उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. तसेच, उभ्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत,उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वरील उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.