जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक जिल्हाध्यक्षाचा राजीनामा !
जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पाटील यांनी वैयक्तिक कारण पुढे करून पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला, तरी त्यामागे नेमकी काय राजकीय पार्श्वभूमी आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सक्रीय झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यात युवक संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक पातळीवरील पक्ष वाढ यामुळे त्यांची ओळख एक प्रभावी युवक नेता म्हणून निर्माण झाली होती. असे असताना, त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक मातब्बर सोडून गेल्यानंतर शरद पवार गटाकडून सध्या संघटनात्मक मजबुतीवर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत युवक संघटनेतील जिल्हास्तरीय नेतृत्वाचा राजीनामा पक्षासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, असे बोलले जात आहे.


आगामी काळात जळगाव जिल्ह्यात युवक नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वासमोर उभे राहणार आहे. दरम्यान, विश्वजीत पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्ष व नेतृत्वाबद्दल आदरभाव व्यक्त केल्याने त्यांनी कोणत्याही पक्ष विरोधी भूमिकेचा संकेत दिलेला नाही. त्यामुळे ते भविष्यात कोणती राजकीय भूमिका घेतात, पुन्हा सक्रिय राजकारणात दिसतात की विश्रांती घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, पाटील यांच्या राजीनाम्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटात निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढली जाते. आणि शरद पवार गट त्यावर कोणती रणनीती आखतो, यावर आगामी स्थानिक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.