राज्यात अवकाळीचा कहर वाढला; जळगावसह 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

0

राज्यात अवकाळीचा कहर वाढला; ६० हजार हेक्टरहून अधिक शेती बाधित, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाचे संकट अधिक तीव्र होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसल्याने भाजीपाला, फळपिके आणि इतर पिके मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहेत. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बळीराजा चिंतेत सापडला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा धोका कायम आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून पुढील काही तासांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे राज्यात सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने नुकसानाचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.