जळगाव गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला ठोकल्या बेड्या

0

जळगाव । जळगाव गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या तीन दुचाकींसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळून दोन लाख 45 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.आरोपींच्या अटकेने चाळीसगाव शहर व मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड) आणि दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव) यांच्यासोबत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून भगवान उर्फ लंगड्या याला जळगाव फाटा, निफाड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे साथीदार आकाश गायकवाड याला सटाणा (ता. सटाणा) आणि दादु सोनवणे याला दरेगाव (ता. मालेगाव) येथून अटक करण्यात आली.

पोलिसांनी या तिन्ही संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसाठी वापरलेली आणखी एक दुचाकी मोटारसायकल देखील आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी आणि चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार मुरलीधर धनगर, पोलीस नाईक, महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भुषण शेलार, सागर पाटील, मिलींद जाधव, दिपक चौधरी आणि पोलीस हवालदार भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.