मतदानाच्या दिवशी जळगावमध्ये मोठा राडा
जळगाव । राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी जळगावमध्ये मोठा राडा झाला आहे. जळगावच्या पिंप्राळामध्ये हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवाराने शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेने जळगावमधील नागरिक भयभीत झाले आहेत.
जळगावमध्ये ऐन मतदानाच्या दिवशी गोळीबार आणि मारहाणीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जळगावच्या पिंप्राळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून झाला अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू आहे.


शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण
जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते वसंत सोनवणे मारहाणीत जखमी झाले आहेत. या मारहाणीनंतर वसंत सोनवणे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपक्ष उमेदवाराने मारहाण केल्याचा शिंदे गटाचे कार्यकर्ते वसंत सोनवणे यांचा आरोप आहे.
जळगावमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप
जळगावात प्रभाग 18 मध्ये सुप्रीम कॉलनीतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक महिला आणि तरुण व्हिडिओत दुसऱ्या मतदार महिलेशी बोलताना दिसत आहे. पैसे देऊनही महिला मतदान करत नसल्याने पैसे परत करावे म्हणत महिला संताप करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पैसे परत करत दुसऱ्या महिलेला देते. दोन तासांपासून बहाणा करत असल्याचा व्हिडिओमध्ये संवाद आहे.