जळगावमध्ये महायुतीच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटपाचा आरोपाने खळबळ
जळगाव । राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येईल. मात्र, प्रचार पत्रके वाटण्यास मनाई आहे. मात्र अशातच जळगावमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय.
जळगावमध्येही मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आपल्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करावं, यासाठी जळगावमधील प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे संतोष पाटील आणि ललित कोल्हे यांच्या वतीने मतदार महिलांना पैसे वाटप केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल करत कैलास हटकर या अपक्ष उमेदवाराने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता पुन्हा त्यांनी महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप करत तसा व्हिडीओ देखील सोशल मिडियामध्ये व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये काही महिलांना रोख रक्कम देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला असून, हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावर पडदा पडलेला नसतानाच कैलास हटकर यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ज्या माध्यमातून त्यांनी प्रचारासाठी बोलविण्यात आलेल्या महिलांना एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासंदर्भातील आणखी एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
आता या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख तथा माजी महापौर ललित कोल्हे यांची पत्नी सरिता कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, ज्या महिलांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे, त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या आहेत. त्यांना त्यांच्या कामाची मजुरी दिली जात होती. मात्र, त्या क्षणाचा व्हिडिओ चित्रीत करून तो चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आणि त्याला पैसे वाटपाचा रंग देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील लढतीला वेगळेच वळण मिळाले असून, व्हायरल व्हिडिओ आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणावर निवडणूक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.