जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण
जळगाव । राज्यात आज २९ महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महिला राज पाहायला मिळालं. जळगावमध्ये देखील ओबीसी प्रवर्गातुन महिलांना संधी मिळाली आहे. महापौर पदासाठी अनेक महिलांमध्ये अतितटीचे चुरस रंगली आहे. अशातच दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे यांची नावे जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी चर्चेत असल्याचं म्हटलं जात आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भाजपकडून दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, माधुरी बारी, वैशाली पाटील, रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे हे चौथ्यांदा नगरसेवक झाले असल्याने निष्ठावंत म्हणून त्यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


जनरलमधून विजयी झालेल्या रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे या तिघांकडे ओबीसी प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर त्यांनाही संधी मिळू शकते. तर वैशाली पाटील या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होत्या असून त्या बिनविरोध विजयी झाल्या.
तसेच त्या भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमित पाटील यांच्या त्या पत्नी असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान ओबीसी महिला राखीव आरक्षण निघाल्याने गेल्या वेळी प्रमाणे, यंदा देखील महापालिकेवर महापौरपदी महिलाच विराजमान होणार असून महापालिकेत महिलाराज पाहायला मिळणार आहे