मक्यावर करपाचा प्रादुर्भाव…जळगाव जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले

0

जळगाव । यंदाच्या खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मका पेरणी झाला आहे. जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार ६५० हेक्टर असताना यंदाच्या खरिपात तब्बल एक लाख ८६ हजार ८८७ हेक्टरवर (२०२ टक्के) मका लागवडीचे क्षेत्र पोहोचले आहे. मात्र पावसाला जोर नसताना मक्यावर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं आहे. खालची पाने अचानक वाळत असल्याचे लक्षात घेता उत्पादन घटण्याच्या शक्यतेने संबंधित सर्व शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळण्याच्या आशेने संबंधित शेतकऱ्यांनी लागवडीपासून आतापर्यंत बियाण्यासह आंतरमशागत, रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या फवारणीवर मोठ्या प्रमाणात खर्चही केला आहे. मक्याचे पीक बहुतेक ठिकाणी आता कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत देखील आहे.

असे असताना, पावसाला अपेक्षित जोर नसल्याने मका पिकाच्या वाढीवर आणि कणसांत दाणे भरण्याच्या अवस्थेवर आता विपरीत परिणाम झाला आहे. त्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने जमिनीकडील खालची पाने हळूहळू वाळण्यास सुरूवात झाली आहे. सर्व साधारणपणे मक्यावर दोन प्रकारचे करपा रोग आढळून येतात. त्यापैकी एक करपा थंड आणि अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात जास्त प्रमाणात वाढतो. सध्या पावसाचा खंड पडलेला असला, तरी सगळीकडे कोरडे वातावरण आहे. त्यानंतरही मक्यावर करपाचा मोठ्या प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाण्याअभावी पीक करपल्यावर जशी अवस्था होते, अगदी तशीच काहीशी अवस्था मक्याची बऱ्याच ठिकाणी झाली आहे. पावसाचा खंड पडल्यानंतर काही शेतकऱ्यांनी मक्याला ठिबकवाटे पाणी देणे सुरू ठेवले आहे. प्रत्यक्षात, त्यानंतरही मक्याची अवस्था सुधारलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.