जळगाव जिल्ह्यात ७५ कोटीचा केळी विम्याचा महाघोटाळा समोर

0

जळगाव | जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत तब्बल ७५ कोटी ३९ लाख रुपयांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात प्रत्यक्षात शेतीत केळी नसतानाही कागदोपत्री बागा दाखवून शासन आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या विशेष चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही तब्बल २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर विमा उतरवण्यात आला होता. बोगस नोंदी करून विमा हप्ते आणि नुकसानभरपाई लाटण्याचा संगनमताने कट रचल्याचे उघड झाले आहे.

या घोटाळ्यात CSC केंद्र चालकांचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पोर्टलवर खोट्या नोंदी करून पडीक जमीन किंवा इतर पिकांवरही केळी दाखवण्यात आली. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील ४८ CSC चालकांची नावे समोर आली असून, प्राथमिक टप्प्यात ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आणि कृषी विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे आणखी मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.