महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
जळगाव । जळगाव शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तब्बल ९१ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून संबंधितांना पुढील १५ दिवस जळगाव शहरात अजिबात फिरकता येणार नाही.
ज्यामध्ये महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही जणांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव महापालिका निवडणूक १६ डिसेंबरला पार पडेल. तर दुसऱ्याच दिवशी १६ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी उपद्रवी तसेच सराईत गुन्हेगार आणि संशयित व्यक्तींवर पोलिसांकडून सातत्याने करडी नजर ठेवण्यात येत आहे.


शहर व परिसरात ठिकठिकाणी विविध पोलीस ठाण्यांकडून नाकाबंदी करण्यात येत असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांविरोधात धडक कारवाई करताना प्रतिबंधात्मक आदेशांची कठोर अंमलबजावणी देखील केली जात आहे. याच अनुषंगाने, दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या एकूण ९१ जणांची यादी तयार करण्यात आल्यानंतर एकतर्फी हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या यादीत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक काही उमेदवारांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
कुठे किती जणांवर कारवाई ?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ३०, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.