सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने दरात वाढ
जळगाव: सोने दराने पुन्हा ग्राहकांना निराश केलं आहे. आज सोने दरात पुन्हा वाढ झाली आहे. यांनतर सुवर्णनगरी जळगावमध्ये जीएसटी विना 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 800 रुपयांवर गेला आहे तर जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 3 हजार 824 रुपयांवर पोहोचला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोन्याने एक नवा उच्चांक गाठला असून, जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक अर्थकारणातील अस्थिरतेमुळे सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे.
जळगाव येथील सुवर्णनगरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीशिवाय 1 लाख 800 रुपयांवर पोहोचला आहे, तर जीएसटीसह याच सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 3 हजार 824 रुपये मोजावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीशिवाय 92 हजार 330 रुपये असून, जीएसटीसह तो 95 हजार 99 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, जीएसटीशिवाय चांदी 1 लाख 17 हजार 500 रुपये प्रति किलो आहे, तर जीएसटीसह ती 1 लाख 21 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे.
या भाववाढीमागे विविध आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात फारसे यश आले नाही. या जागतिक अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे, असे सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “फेडरल बँकेचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.”
सण-उत्सवाच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा महिलांचा उत्साह नेहमीच असतो. मात्र, सध्याच्या अनपेक्षित भाववाढीमुळे ग्राहकांना आर्थिक तडजोड करावी लागत आहे. ग्राहक मीना हिवाळे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “सोन्याचे भाव वाढल्यामुळे दागिने खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. तरीही थोडीफार गुंतवणूक म्हणून तडजोड करून सोने खरेदी करावे लागत आहे.” ही परिस्थिती सण-उत्सवातील खरेदीवर निश्चितच परिणाम करत आहे, हे दिसून येते.