जळगावात केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
जळगाव: राज्यात एकीकडे मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे याच योजनेच्या नावाखाली जळगावात एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोकुळ रमेश चव्हाण याने मदतीच्या नावाखाली आपला अघोरी चेहरा समोर आणला. पीडित महिला योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेसाठी प्रयत्न करत असताना, आरोपीने “मी तुमचे काम करून देतो” असा विश्वास दाखवला. कागदपत्रे पडताळणीच्या बहाण्याने तो महिलेच्या घरात शिरला. मात्र, तिथे गेल्यावर त्याने मदतीऐवजी आपली विकृत मानसिकता दाखवत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.


पोलीस तपासात आणि फिर्यादीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. हा नराधम इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दुसऱ्या एका गरजू महिलेलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. “तुमचे बंद पडलेले निवृत्ती वेतन (Pension) पुन्हा सुरू करून देतो,” असे आमिष दाखवून त्याने त्या महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केली. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली हा आरोपी महिलांची ‘शिकार’ करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आरोपीने केलेल्या मागणीमुळे पीडित महिला सुरुवातीला हादरून गेली, मात्र तिने डगमगता तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि या सैतानाचा खरा चेहरा जगासमोर आणला. जळगाव शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी गोकुळ चव्हाण पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे