जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

0

जळगाव । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद साद अय्युब खान (रा. शाहूनगर, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १० फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली. उस्मानिया पार्क व शिवाजीनगर परिसरात एक तरुण मोटारसायकलवर बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाईची आखणी केली.

रात्री उशिरा सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह त्याची मोटारसायकलही जप्त केली आहे.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीने शस्त्र कोठून मिळवले व त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. हवालदार सुनील पाटील पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.