जळगावात मंदिरातील दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक
जळगाव । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुकुंदनगर लाठी शाळेच्या मागच्या बाजूला मानेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील दागिने मंदिराजवळील एका घरात ठेवले होते. या घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत हे दागिने चोरून नेले. या चोरीचा छडा लावून पोलिसांनी याप्रकरणी शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. कासमवाडी जळगांव), राहुल शेखर रावळकर (वय-३२, रा. जाखनी नगर कंजरवाडा जळगांव) या दोघांनी सोमवारी (दि.१४) अटक केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जळगांव शहरातील मुकुंदनगर येथील लाठी शाळेच्या मागे मानेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील चांदीच्या दागिन्यांसह इतर दागिने मंदिरासमोर राहत असलेल्या अरुण लक्ष्मण शेटे यांच्या घरी ठेवलेले असतात. व सण – उत्सवादिवशी ते दागिने शिवलिंगाला चढविले जातात. अरुण शेटे हे कुंटुबासह पुणे येथे मुलाकडे गेले असता ६२ हजार किमतीचे हे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
शेटे हे घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात धाव घेत यांची फिर्याद दिली. घटनेचे गाभिर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तापसत त्या आधारे दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, प्रदिप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी केली.