केळी उत्पादकांना दिलासा…. जळगावमधील निर्यात क्षमता वाढीसाठी मुंबईत आढावा बैठक !
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. बैठकीला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचीही उपस्थिती होती.
बैठकीत हवामानावर आधारीत केळी पिकविमा योजनेंतर्गत प्रलंबित दावे, शेतकऱ्यांना वेळेत विमा रक्कम मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही तसेच केळी निर्यात सुविधा केंद्रांची संख्या आणि क्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश बैठकीतून दोन्ही मंत्र्यांकडून देण्यात आले.


जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनाचा केंद्रबिंदू असून, येथील शेतकऱ्यांचे कष्ट आणि उत्पादनाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता पावलेली आहे. शासनाच्या माध्यमातून हवामानावर आधारीत केळी पिकविमा दावे तातडीने निकाली काढले जातील. तसेच निर्यात साखळी अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत बोलताना दिली. राज्य शासन केळी निर्यातीत महाराष्ट्राला अग्रस्थान मिळावे, यासाठी कटिबद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात निर्यात सुविधा केंद्रांची संख्या वाढविण्यासह शीतगृहे उभारणी आणि आधुनिक पॅक हाऊसची सुविधा निर्माण केली जाईल, असे पणन मंत्री रावल म्हणाले.