जळगावात आक्रोश मोर्चानंतर पोलिसांना धक्काबुक्की…बच्चू कडू यांच्यासह १३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल !
जळगाव । शेतकऱ्यांनी शेतीचे प्रश्न घेऊन बुधवारी जळगावमध्ये आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून बळजबरी प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू तसेच शिवसेनेचे (उबाठा) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि इतर पक्षांच्या ११ पदाधिकाऱ्यांविरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने सोमवारी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आल्यानंतर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळेस आंदोलकांनी काळ्या फिती आणि काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.


शिवसेनेचे (उबाठा) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि शेतीप्रश्नांशी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे, असा आग्रह आंदोलकांनी धरला. मात्र, बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही जिल्हाधिकारी किंवा दुसरे कोणतेही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळी आले नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू हे शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी आधीच मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासह उन्मेश पाटील आणि शेतकऱ्यांनी बळजबरीने मुख्य प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. इतकेच नव्हे तर प्रशासकीय इमारतीच्या लोखंडी गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांना न जुमानता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळवला होता.
ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. या सर्व कारणांवरून जळगावमधील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नाईक भरत चव्हाण यांच्या तक्रारीवरून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.