जळगावात भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव शहरातील जुना निमखेडी रोडवर पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन सख्खे भाऊ, ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शिवदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मृतांपैकी ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या जळगाव शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती असून, प्रमोद शिवदे हे त्यांचे दीर होते. दोघेही पहाटे चारच्या सुमारास आपल्या पाणीपुरी व्यवसायासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी रिक्षाने निघाले होते. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांपैकी एका डंपरने धडक दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महानगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही कर्ते पुरुष गमावल्याने ज्योती शिवदे यांचा आक्रोश हृदयद्रावक ठरला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.