धरणगाव व एरंडोल तालुक्यात कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी; रस्त्यावर युरिया ट्रक अडवून साठ्याची तपासणी
जळगाव | जिल्ह्यात युरिया खताची कोणतीही कमतरता नाही. खत विक्रेत्यांनी सौजन्यपूर्ण व पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना युरीया विक्री करावी आणि शेतकऱ्यांमध्ये नैनो युरीयाच्या वापरास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज केले.
धरणगाव व एरंडोल तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी खत उपलब्धतेचा, साठ्याचा व पौस वरील विक्री प्रक्रियेचा बारकाईने आढावा घेतला. विक्रेत्यांनी पौस-आधारित प्रणालीच्या माध्यमातूनच खत विक्री करावी, भाव व साठा फलक अद्ययावत ठेवावा, कायद्यानुसार (M-Form नुसार )बिल द्यावे आणि कुठल्याही प्रकारचे लिकिंग करु नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. खतांच्या साठवणुक व विक्री मध्ये अनियमितता आढळल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रस्त्यावर युरीया ट्रक अडवून साठ्याची तपासणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद धरणगावकडे जात असताना मार्गात त्यांना युरिया खताने भरलेली ट्रक दिसली. त्यांनी तत्काळ सरकारी वाहन बाजूला लावून सदर ट्रक थांबवली आणि वाहनचालकाकडील स्लीपवरील साठा व प्रत्यक्ष गाडीत असलेला साठा यांची पडताळणी केली. सदर युरिया ट्रक धरणगाव व एरंडोल तालुक्यातील विविध सेवा केंद्रांना पुरवठ्यासाठी जात होती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी युरियाचा साठा व पुरवठा साखळीतील पारदर्शकता स्वतः तपासून खात्री करून घेतली.
– जिल्हाभर खत विक्री केंद्राचे तपासणी सत्र राबविण्याचे भरारी पथकास निर्देश –
जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना सुरळीत युरीया पुरवठा व्हावा , याकरीता कृषी विभागाच्या जिल्हा स्तरीय भरारी पथकांचे प्रमुख श्री.पद्मनाभ म्हस्के यांना याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांच्या अचानक तपासण्या करण्याचे निर्देश मा . जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. आवश्यक असल्यास कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे उपस्थितीमध्ये खत विक्री केंद्रावर युरीया विक्री करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागास दिले.
नैनो युरियाच्या वापरावर भर देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र चालकांना स्पष्टपणे सांगितले की, पारंपरिक युरिया पोत्यांच्या तुलनेत नैनो युरिया अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहे. “एक पोते युरिया म्हणजे ४५ किलो युरिया एवढीच कार्यक्षमता फक्त १ नैनो युरिया ची बाटली देते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. नैनो युरियामुळे नायट्रोजन थेट पानांवरून शोषले जाते, त्यामुळे ते माती वा पाण्यात मिसळत नाही व मानवी आरोग्याला धोका निर्माण होत नाही. मातीचे आरोग्य टिकून राहते आणि पाण्यातील प्रदूषणही टाळता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यात इफकोचे अधिकारी संदीप रोकडे यांनीही नैनो युरियाचे फायदे विषद केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के देखील यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व विक्रेत्यांनी शेतकऱ्यांमध्ये नैनो युरिया वापराबाबत जागृती करावी, असे आवाहन करत पारदर्शक व उत्तरदायित्वाने काम करण्याचे आवाहन केले.