नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार असून यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये उतरले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या २ बॅगांची तपासणी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँडिग होताच निवडणूक अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी त्यांच्या बॅगामध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही.काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिंदेंनी बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी ही झाली आहे. ‘आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो आहोत’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
संजय राऊतांनी काय आरोप केले होते?
संजय राऊत यांनी सोमवारी आरोप करताना म्हटलं होतं की, ‘मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरमधून १२-१२ बॅगा आणल्या होत्या. नाशिकमध्ये दोन तासांसाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरताना दिसत होते. ५०० सूट की ५०० सफारी आणल्या होत्या? त्या बॅगा कसल्या आहेत. त्या कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या. त्यानंतर कोणाल्या वाटल्या? तो व्हिडिओ सुद्धा देत आहोत’.