शिरंबे येथील शहीद जवान रघुनाथ पवार यांच्या अमर जवान स्मारकाचे उद्घाटन
शहीद रघुनाथ पवार यांच्या आठवणींच्या उजाळ्याने सर्वांचे पाणावले डोळे
चिपळूण (ओंकार रेळेकर) | तालुक्यातील शिरंबे येथील शहीद जवान रघुनाथ बाबुराव पवार यांच्या अमर जवान स्मारकाचे उद्घाटन नुकतेच मान्यवर, माजी सैनिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शहीद रघुनाथ पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. एकंदरीत हा भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले.
शिरंबे गावचे सुपुत्र शहीद जवान रघुनाथ बाबुराव पवार हे सियाचिन ग्लेशिआर दोन या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झाले. ज्या ठिकाणी ते देशसेवेचे आपले कर्तव्य बजावत होते. त्या पाॕइंटवर महाबर्फवृष्टी झाली. बराच काळ ते तिथुन बाहेर पडू शकले नाहीत. दरम्यान, त्यांच्या डाव्या पायाला बर्फाचे इंफेक्शन झाले. संपुर्ण डावा पाय निकामी झाला. उपचारा दरम्यान त्यांना त्याच ठिकाणी वीरगती प्राप्त झाली.ही घटना १७ जानेवारी १९८७ रोजी घडली. आपल्या गावातील शहीद जवानाचे नवीन पिढीला स्मरण राहावे, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शहीद रघुनाथ पवार यांचे अमर जवान स्मारक उभे केले आहे.
यास मार्गाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर व माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शहीद रघुनाथ पवार यांना सलामी देण्यात आली.यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ऑरनरी कॅप्टन श्री. चाळके सुभेदार आत्माराम कदम, जिल्हा संघटनेचे सचिव गणेश अर्जुन सुर्वे, चिपळूण तालुका संघटनेचे सचिव उमेश महाडीक, संघटनेचे सक्रिय सभासद मनोज पालांडे आदी उपस्थित होते. शिरंबेवासियांनी माजी सैनिकांचा यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाने ग्रामस्थ उपस्थित मान्यवर भारावून गेले. या निमित्ताने शहीद सैनिक रघुनाथ पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरंबे ग्रामस्थांनी मेहनत घेतली.