इगतपुरीतील मराठा समाजाकडून आंदोलनाला रसद पुरवठा

0

इगतपुरी : मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. आंदोलन स्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्नपाण्याची कमतरता भासू नये म्हणून इगतपुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर भाकरी, ठेचा, पाण्याच्या बाटल्या तसेच कच्चा शिधा अशा जीवनावश्यक वस्तूंसह सात ते आठ पिकअप गाड्या आणि आचारी रवाना करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मराठा मायमाऊलींनी स्वतःच्या हाताने भाकऱ्या तयार करून दिल्या असून, त्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे पाठवण्यात आल्या आहेत.

या संदर्भात स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की,
“सरकारने मराठा समाजाचा अन्नपुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ताकदीपुढे तो प्रयत्न फेल ठरला आहे. आज महाराष्ट्रभरातून इतकं अन्न मुंबईकडे पोहोचत आहे की, संपूर्ण मुंबईला आम्ही खाऊ घालू शकतो. हीच मराठा समाजाची ताकद आहे. भुजबळ साहेब, आपण ओबीसी समाजाची बैठक घेत आहात, आम्हालाही त्यात सामावून घ्या, आम्हीही येऊ. पण आपण त्याउलट विरोध करत आहात. त्यामुळेच आपले मंत्रीपद आधी गेले, आताही जाऊ शकते. आपल्या भोवती फिरणाऱ्या चमच्यांना आपण समज द्यायला हवी.”

डॉ. नाठे यांनी पुढे सांगितले की, “या आंदोलनासाठी ओबीसी समाजातील मायमाऊलींनीही भाकऱ्या करून दिल्या आहेत. म्हणजेच ओबीसी समाज आमच्या पाठीशी उभा आहे. जर मनोज जरांगे यांच्या बाबतीत काहीही विपरीत घडले, तर रस्ते काय, रेल्वे काय, अगदी विमानसेवाही ठप्प करण्याची ताकद मराठा समाजात आहे.”

या आंदोलनामुळे मराठा बांधवांमध्ये उत्साह व निर्धाराचे वातावरण असून, संपूर्ण महाराष्ट्रभरातून अन्नधान्य, पाणी व रसद सामग्री मुंबईकडे रवाना करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.