जळगावात बॅनरबाजीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज रविवार (दि.17) रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जागोजागी झेंडे व बॅनरबाजी सुरू झाली असून काही ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागीच धोकादायक पद्धतीने बांबूचे स्ट्रक्चर उभारून त्यावर बॅनर लावले जात आहेत. विशेषतः आकाशवाणी चौकातील स्ट्रक्चरमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आकाशवाणी चौकात धोकादायक स्ट्रक्चर
आकाशवाणी चौक हा शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असून, येथील चौकाच्या मध्यभागी बांबूचे चौकोनी स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. त्यावर मोठमोठे बॅनर लावण्यात येत आहेत. मात्र या धोकादायक फलकांसाठी परवानगी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादळी वारे वा पावसामुळे हे स्ट्रक्चर कोसळले तर मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांमधून उपस्थिज होत आहे.


मनपाचे होतेय दुर्लक्ष
महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे गौरव सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईसंदर्भात कर्मचारी वसंत पाटील यांच्याकडे विचारणा करण्यास सांगितले असतापाटील यांनी यांसदर्भात नोटीस दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष भेटीत शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस आल्याने ही नोटीस सोमवारी (दि.11) रोजी बजावली जाणार असून त्यावर मनपा आयुक्तांची स्वाक्षरी होण्यास विलंब लागत असल्याचे कळवले आहे. मनपाच्या उप आयुक्त धनश्री शिंदे यांनी याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.
नियमबाह्य बॅनरबाजी करत कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट असून, जीएस ग्राऊंडवर वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आला आहे. मात्र नेत्याबद्दल निष्ठा दाखवण्याच्या नादात रस्त्यांवर अनधिकृत बॅनरबाजी व स्ट्रक्चर उभारले जात असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याकडे दुर्लक्ष होत आहे.