२०२६ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र सरकारने २०२६ या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, २०२६ मध्ये महाराष्ट्रात एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार असून भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची सुरुवात २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनापासून होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन महत्त्वाच्या सुट्ट्या आहेत. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आणि १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती. मार्च महिना सुट्ट्यांच्या बाबतीत भरलेला असेल, ज्यात एकूण चार सार्वजनिक सुट्ट्या आहेत: ३ मार्चला होळी, १९ मार्चला गुढीपाडवा, २१ मार्चला रमजान ईद आणि २६ मार्चला रामनवमी.


एप्रिलमध्ये दोन सामान्य सुट्ट्या असून, फक्त बँकांसाठी एक विशेष सुट्टी आहे. ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी असेल. बँकांसाठी १ एप्रिल २०२६ रोजी वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिन (१ मे) आणि बुद्ध पौर्णिमा (१ मे) एकाच दिवशी येत आहेत. याव्यतिरिक्त, २८ मे रोजी बकरी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जूनमध्ये २६ जून रोजी मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. ऑगस्ट महिन्यात एकूण तीन सुट्ट्या आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष (शहेनशाही) आणि २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद. सप्टेंबर महिन्यात १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) आणि २० ऑक्टोबरला दसरा या दोन प्रमुख सुट्ट्या असतील.
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्ट्या आहेत. ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबरला दिवाळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ११ नोव्हेंबरला भाऊबीजसाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सुट्टी असेल. २०२६ वर्षाचा शेवट डिसेंबर महिन्यात २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या सुट्टीने होईल. ही संपूर्ण यादी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ मध्ये सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.