जागतिक स्पर्धेत इगतपुरीच्या हर्ष व्यास यांचा ऐतिहासिक विजय ; ५ पदकांसह भारताचा झेंडा गौरवाने फडकवला.

0

इगतपुरी : जागतिक स्तरावर डिसेंबर २०२५ च्या पार पडलेल्या शक्ती क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत इगतपुरी शहरातील हर्ष व्यास यांनी ऐतिहासिक विजय मिळवीत पाच पदकांसह भारताचा झेंडा गौरवाने फडकावत देशाचे नाव उज्ज्वल केले. रशियातील मॉस्को येथे डिसेंबर २०२५ – जागतिक स्तरावर शक्ती-क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप World Championship 2025 स्पर्धा रशियाची राजधानी मॉस्को येथे मोठ्या दिमाखात पार पडली. या भव्य स्पर्धेत ३० देश, ८० राज्य, ४२९ शहरे, तसेच एकूण ३,०३४ आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ज्यात ६०३ महिला आणि २,४३१ पुरुष खेळाडू होते. इतक्या उच्चस्तरीय स्पर्धात्मक वातावरणात भारतातील इगतपुरी शहरातील युवा खेळाडू हर्ष भाग्यशाली प्रमोद व्यास यांनी आपल्या अद्वितीय कामगिरीने जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
एकूण पदकतालिकेत इराणने प्रथम क्रमांक, रशियाने द्वितीय क्रमांक, तर भारताने तृतीय क्रमांक पटकावत जागतिक पटलावर आपली ताकद सिद्ध केली. भारताच्या या उल्लेखनीय यशात हर्ष व्यास यांच्या पदकांची मोलाची भर पडली. २० ते २३ वयोगटातील ज्युनियर विभागात स्पर्धा करत असूनही, हर्ष व्यास यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, अपूर्व शारीरिक सामर्थ्य आणि विलक्षण मानसिक दृढतेच्या जोरावर एकूण पाच आंतरराष्ट्रीय पदके जिंकत भारताला गौरवाचे पाच सुवर्णक्षण प्रदान केले.

हर्ष व्यास यांनी जिंकलेली पदके:
• कांस्य पदक – फुल पॉवरलिफ्टिंग
• सुवर्ण पदक – डेडलिफ्ट
• सुवर्ण पदक – पॉवर स्पोर्ट
• सुवर्ण पदक – पुष-पुल पॉवरलिफ्टिंग
• सुवर्ण पदक – पुष-पुल ड्रग टेस्टेड

या पाचही पदकांनी हर्ष व्यास यांनी जागतिक रंगमंचावर भारताचे सामर्थ्य आणि प्रतिभा उजळून टाकली. स्पर्धेदरम्यान त्यांच्या प्रत्येक लिफ्टला उपस्थित प्रेक्षकांकडून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. हर्ष व्यास सध्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी अंतर्गत सिंडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक संस्थेने आणि विशेषतः सिंडनहॅम अल्युम्नी असोसिएशन यांनी त्यांच्या रशिया प्रवासासाठी मोठे योगदान देत संपूर्ण प्रायोजकत्वाची जबाबदारी स्वीकारली होती.

“भारत माता हीच माझे सर्वोच्च प्राधान्य असुन क्रिडा असो वा जीवन, माझ्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. माझ्या प्रेरणास्थानाबद्दल बोलायचे झाले, तर मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांकडून धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान शिकतो. आज मी जिंकलेले हे पदक फक्त माझे नसुन ते माझ्या देशाचे, महाराष्ट्राचे, माझ्या इगतपुरी शहराचे आणि मला निस्वार्थ साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे अशी भावना जागतिक विजयानंतर हर्ष प्रमोद व्यास यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.