मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हडपसर–यवत सहा पदरी रस्ता प्रकल्पाला गती

0

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती

नागपूर | मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, नागपूर येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत राज्यातील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील सुरु असलेल्या रस्ते सुधारणा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागाअंतर्गत रस्ते विकासकामांची विद्यमान स्थिती, प्रगती व पुढील अंमलबजावणीच्या दिशेबाबत सविस्तर मांडणी केली. हडपसर ते यवत रा. मा. ६५ (किमी ८/५०० ते ४०/०००) या महत्त्वाच्या प्रकल्पाअंतर्गत किमी ८/५०० ते ३३/५०० दरम्यान सहा पदरी उन्नत मार्गाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील रस्त्याचा सहापदरी विस्तार करण्यात येणार आहे. पुढे किमी ३३/५०० ते ४०/००० या टप्प्यात अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम प्रस्तावित असून संपूर्ण प्रकल्पासाठी राज्य वस्तू व सेवा कर (SGST) मधील सवलत मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीदरम्यान विचारात घेण्यात आला.

या प्रकल्पामुळे पुणे–दौंड–यवत परिसरातील वाहतूक वेगवान, सुरक्षित व सुव्यवस्थित होणार असून औद्योगिक क्षेत्र, शेती उत्पादन वाहतूक, नागरिकांची दैनंदिन प्रवास सुविधा आणि आर्थिक क्रियाकलापांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत नमूद केले.

यावेळी बैठकीस उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री श्री हसन मुश्रीफ, मंत्री श्री प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) सौ. मनीषा म्हैसकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दर्जेदार, टिकाऊ आणि सुरक्षित रस्ते नेटवर्क उभारणे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य प्राधान्यक्रम असून विभागातील सर्व प्रकल्प वेगाने व कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.