‘जर युती तुटली तर कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल’ ; गुलाबराव पाटलांना चिंता
आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र विविध ठिकाणी तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील इतर महानगरपालिकेत तेथील परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र जळगावमधील शिवेसना आमदार गुलाबराव पाटील यांनी ‘जर युती तुटली तर कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल’, असे म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
“स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो पण युती करा. युती जर केली नाही तर कार्यकर्ते मरुन जातील. दोन चार जागा इकडे तिकडे करा, पण युती करा. आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाही?” असा प्रश्न यावेळी गुलाबराव पाटील यांनी विचारला.


सलग तीन-चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो
दरम्यान, महायुतीमधील तिन्ही पक्षांनी जेथे जमेल तेथे युती नाहीतर स्वबळाची शक्ती दाखवायची असं ठरवलं. मुंबई, ठाणे या ठिकाणी शिंदे गट पुणे, पिंपरी चिंचवड येथे अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. “भाजपवाले एकीकडे आपल्याला युती करायचं असं सांगतात आणि एकांतात स्वबळाची भाषा बोलतात. लोकसभा विधानसभेला कार्यकर्ता काम करतो, त्यामुळे दोन-चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याला मोठं करण्याची हीच निवडणूक असते. लोक आता हुशार झाले आहेत. पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, पण सलग तीन-चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो,” असे पाटील म्हणाले. Gulabrao Patil |
आम्ही गद्दार असल्याची टीका सहन करतोय
पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, “राजकारणात विरोधक असायला हवे, तरच राजकारण चालेल. विरोधक हे होकायंत्राच्या प्रमाणे असतात. त्यांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शक असल्याने फायद्याची ठरते. आमच्यावर विरोधक किती टीका करतात. विरोधकांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शक असते, गेली वर्षभर आम्ही गद्दार असल्याची टीका सहन करतो,” असंही ते म्हणाले.