ठाकरे बंधु एकत्र आले चांगली गोष्ट, पण.. विरोधकांनी ‘त्या’ विषयाचा बाऊ केला ; गुलाबराव पाटील
जळगाव । राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. यावरच आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ठाकरे बंधु एकत्र आले, ठीके, चांगली गोष्ट आहे. कोणतेही पक्ष एकत्र होतात, शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे.
त्यात आपण बोलणे उचित नाही, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, आपण त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. आपण फक्त आपल्या पक्षाचे काम करणं, महायुतीच्या सरकारचं काम अजून आणखी गतीने वाढवले पाहिजे. समोरच्याकडे काय अजेंडा आहे? हे आपल्याला माहिती आहे. मराठी आपण पण आहोत, आणि ते देखील मराठी आहेत. फक्त विषय असा आहे की, पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी विषय सक्ती करू नये.
पाचवीपासून सगळे हिंदी बोलतात, मी देखील पाचवीनंतर हिंदी शिकलो आहे. विषय इतकाच आहे की, त्यांनी या विषयाचा बाऊ केला म्हणून आपण करावे, असे आम्हाला वाटत नाही. कोणावर बोलण्यापेक्षा आपल काम जोरात चालल आहे.