गुलाबराव देवकर करणार अजित पवार गटात प्रवेश; जळगावात शरद पवार गटाला मोठा धक्का
जळगाव । जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरदचंद्र पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे.
प्रवेशाच्या चर्चेला खुद्द गुलाबराव देवकर यांनीही दुजोरा दिला आहे. जळगाव ग्रमीण मतदारसंघातून देवकरांनी शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराजयाचा झटका बसला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार गटासाठी हा जळगाव जिल्ह्यातून आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
आता देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. देवकर यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. तसेच या भेटीदरम्यान देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली. यासह तटकरे यांनीही देवकरांच्या प्रवेशाबाबत सकारत्मकता दर्शविली आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव आमदार असलेले अनिल पाटील हेच नेते आहेत. आता गुलाबराव देवकरांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास त्या माध्यमातून एक मोठा नेता त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी फायदा होणार आहे.