जळगावमध्ये पुन्हा गोळीबार; तरुणाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी !
जळगाव । शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील कांचननगरात रविवारी रात्री गोळीबार झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर (२९), असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश रवींद्र सोनवणे (२८), तुषार रामसिंग सोनवणे (३०) आणि सागर सुधाकर सपकाळे (२४), अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.


कांचननगरातील विलास चौकात आकाश उर्फ डोया सपकाळे आणि सागर सपकाळे यांच्यात जुन्या वादातून रविवारी रात्री साधारणपणे साडेदहाच्या सुमारास बाचाबाची झाली. वाद जास्तच वाढल्यानंतर आकाश आणि त्याच्या सोबतच्या करण उर्फ तांडव राजपूत या दोघांनी गावठी बंदुकीतून बेछुट गोळीबार केला. त्यामुळे आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याच्या छातीत एक गोळी घुसली. तशाच अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
गोळीबारात गणेश सोनवणे, तुषार सोनवणे आणि सागर सपकाळे हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.