सोनं झालं स्वस्त! २४ तासांत २३६९ रुपयांनी घसरलं

0

जळगाव । लाखापुढे सोन्याचे दर गेल्याने निराश आणि हैराण झालेल्या ग्राहकांना बुधवारी सकाळी काहीसा दिलासा मिळाला. आज बुधवारी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. तब्बल २३६९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत घसरले.

जळगावमध्ये गुढीपाडव्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर सुरू झालेली घसरण पुढील काही दिवस कायम राहिल्याने सोने ९१ हजार ४६४ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, नऊ एप्रिलला पुन्हा उसळी घेतलेल्या सोन्याचे दर प्रतितोळा ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दरवाढीत सातत्य राहिल्याने २२ एप्रिलपर्यंत सोन्याचे दर उच्चांकी प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत स्थिरावले.

दरम्यान, गेल्या १४ दिवसात तब्बल १० हजार ५०६ रुपयांनी सोने वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिक अवाक झाले होते. अक्षय्य तृतियेच्या सणापूर्वीच सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालत असताना, पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. प्रत्यक्षात, बुधवारी सराफ बाजार उघडताच मंगळवारच्या तुलनेत तब्बल २३६९ रुपयांची घट सोन्याच्या दरात नोंदविण्यात आली. मागील दोन आठवड्यांपासून उच्च पातळीवर असलेल्या सोने दरात मोठी घट नोंदविण्यात आल्यानंतर विशेषतः सुवर्ण व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कारण, उच्चांकी दरवाढीनंतर सराफ बाजारातील सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ठप्प झाले होते. सोने दरातील घसरण एका दिवसापुरतीच राहते की अक्षय्य तृतियेपर्यंत त्यात सातत्य राहते, याकडे आता ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.