मंत्री महाजनांच्या वक्तव्याने जळगाव जिल्ह्यातही महायुतीमध्ये फाटा फूट
जळगाव । येत्या एक ते दोन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुती सरकारने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीमध्ये काही ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातही महायुतीमध्ये फाटा फूट झालीय.
कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. आता आमदार पाटीलांचे आव्हान भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्वीकारले आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपही स्वबळावर लढेल, असे महाजन यांनी म्हटले.


भाजपमधील वरिष्ठ आणि रणनीतीकार पॅनेलमधील नेते असल्याने महाजन यांच्या वक्तव्याने आता जळगावात महायुती फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे “आमदार किशोर पाटील यांनी चर्चेची दारे बंद केली. मग आम्ही त्यांच्या मागे फिरायचे का?… त्यांना मस्का लावायचा का?, भाजप हा मजबूत पक्ष आहे,” असे म्हणत महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. अवघ्या काही दिवसांपूर्वी आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर गद्दारीचा आरोप करत स्वबळाचा नारा दिला होता.
भाजपने माझ्याविरुद्ध निवडणूक लढणाऱ्या किंवा माझ्या विरोधातील सर्वांना प्रवेश दिला असल्याचे म्हणत स्वबळावर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लढवण्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार किशोर पाटील यांनी केली होती. त्यानंतर, आमदार मंगेश चव्हाण यांनीही भाजप स्वबळावर लढेल, असे सांगितले होते. किशोर पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. “आम्ही भाजपमध्ये शरद पवार गट आणि शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे. पण, मित्रपक्षातील कुणालाही घेतलेलं नाही. पाचोरा भडगाव येथे राज्यात महायुतीतच लढायचे हे आमचे धोरण आहे, परंतु जिथे शक्य नाही, टोकाचे वाद आहेत, अशा काही ठिकाणी अपवादत्मक स्थितीत स्वबळावर लढावे लागेल.”, असे महाजन यांनी स्पष्ट केले.