घरफोडीतील चोरटा अवघ्या सहा तासांत जेरबंद
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे बंद घरात घडलेल्या घरफोडीचा अवघ्या ६ तासांत छडा लावून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चोरट्याने घरातून ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. मेहूणबारे पोलिसांनी तपास करून चोरी केलेले दागिने वितळवून तयार केलेली ३ लाख २० हजार रुपयांची लगड जप्त केली आहे.
दीपक नामदेव पाटील (वय ४८, रा. देवळी, ता. चाळीसगाव) हे १६ मे रोजी आपल्या कुटुंबासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि लोखंडी शोकेसमधील लॉकर फोडून ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेची तक्रार २० मे रोजी मेहूणबारे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल होताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ६ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला.
प्रवीण सुभाष पाटील (वय ३२, रा. बिलवाडी, ता. जळगाव) या अभिलेखावरील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून, तपासादरम्यान त्याने दागिने एका सराफाकडून वितळवून घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त केली.