माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

जळगाव । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी मोठी अडचण झाली. कारण शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप हा गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर बँकांना गंडवल्याचा आरोप केला होता. त्या वक्तव्यानंतर केवळ तीन दिवसांनी या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने या घटनेला राजकीय रंग चढल्याची चर्चा आहे.

उन्मेष पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला

उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यात भूखंड व्यवहारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह इतर बँकांनाही गंडवले असल्याचा आरोप केला होता. त्या वक्तव्यानंतर केवळ तीन दिवसांनी या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने या घटनेला राजकीय रंग चढल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.