सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती

0

जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ

जळगाव |  “आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा शब्दांत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रमात निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ म्हणून १०,००० रुपयांचा निधीचे योगदान दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या विशेष कार्यक्रमात यंदाचा १ कोटी ३२ लाख रुपये निधी संकलनाचा लक्ष्य जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के पूर्ण केल्याची माहिती देताना त्यांनी नागरिक, शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांचे आभार मानले. येत्या नवीन सत्रात उदिष्टापेक्षा अधिक निधी जमा करून सैनिक कल्याण उपक्रमांना अधिक बळ देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी घुगे यांनी आपल्या मिलिटरी स्कूलमधील शिक्षणाचा उल्लेख करत जम्मू-काश्मीरमधील एलओसीवरील सैनिकांच्या सेवेसंबंधी प्रत्यक्ष पाहिलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. अत्यंत प्रतिकूल थंडी, शून्याखालील तापमान, गोठलेली जलवाहिनी आणि कठोर परिस्थितीतही निर्धाराने कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचे वर्णन करताना ते क्षणभर भावूक झाले. “सीमेवर उभा असलेला सैनिक सर्वात आधी देशाची आणि नंतर आपली कुटुंबाची काळजी करतो. त्याच्या कुटुंबियांच्या अडचणी—रुग्णालय, शिक्षण, जमीन व्यवहार किंवा अन्य प्रशासनिक कामे—सोडवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे स्पष्टपणे सांगत त्यांनी सैनिक कुटुंबांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.

जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरात निधी संकलनाबरोबरच कायदेविषयक सहाय्य, उपकरणे, मशीन उपलब्ध करून देणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे यांत नागरिकांचा मोठा सहभाग लाभल्याचे त्यांनी नमूद केले. सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आवश्यक सर्व समन्वय अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात, तसेच दहावी–बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वीरनारी, वीरमाता, वीरपिता, तसेच उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या शासकीय कार्यालय प्रमुखांचा गौरव करण्यात आला. ध्वज दिन निधी संकलन मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात ध्वज दिन संकलनाची पार्श्वभूमी, संकलनातील जिल्ह्याचे यश आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, माजी कर्नल व्ही. के. सिंग, जळगाव जिल्हा वकील संघ अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, आरटीओ अधिकारी यांच्यासह शहीद सैनिकांचे पालक, वीरनारी, निवृत्त सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.