जळगाव सुवर्ण बाजारात सोने आणि चांदी दरात मोठी घसरण
जळगाव । सोने आणि चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सोने, चांदीच्या दर कमी होत आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात चांदीच्या दरात तब्बल चार हजारांची, तर सोन्याच्या दरात १८०० रुपयांची घसरण झाली आहे. सोनं आधीपेक्षा स्वस्त झालं असल्यामुळे सोनंखरेदीची ही सुवर्णसंधी आहे.
आज सोने ’जीएसटीसह’ प्रती दहा ग्रॅम ७३ हजार ३३६ वर पोहोचले आहे. तर चांदी प्रती किलो ९१ हजार ६७० रुपये होती. गेल्या मे महिन्यात सोने आणि चांदी दरवाढीने आतापर्यंतची मोठी उसळी घेतली आहे. २२ मे रोजी चांदीच्या भावात तीन हजारांची वाढ झाली होती. तेव्हा चांदी प्रतिकिलो लाखावर जाते की काय? याबाबत विविध अंदाज वर्तविले गेले.
चांदीचा बुधवारी भाव प्रतिकिलो ९५ हजार ७९० रुपये जीएसटीसह होता, तर सोने ७६ हजार २२० (जीएसटीसह) प्रति दहा ग्रॅम होते.लग्नसराई नसताना सोने, चांदीच्या भावात झालेली वाढ सर्वांसाठी चक्रावून टाकणारी आहे. आता आगामी दोन महिने लग्नसराई नाही. यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. यामुळे सोने, चांदीत मोठी घसरण झाली आहे.