फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार- भारतीय कृषि विमा कंपनीकडून प्रयत्न सुरू

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यात सन २०२४-२५ करिता पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) अंतर्गत मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा आणि पपई या अधिसूचित फळपिकांचा समावेश करण्यात आला होता. ही योजना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत राबविण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत हवामान बदलामुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून भरपाई देय राहिली असून, जिल्हा कृषी कार्यालयाकडून शेतक-यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अशी माहिती कृषी विभागाने दिली

या विषयाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) यांनी विशेष लक्ष दिले आहे. तसेच केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, तसेच खासदार स्मिताताई वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी या फळपिक विमा भरपाईच्या प्रकरणी जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत नियमित बैठक घेऊन भारतीय कृषि विमा कंपनीला शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते

दरम्यान, विमा कंपनीकडून नुकतेच हेक्टरी पे-आऊट रक्कमेची माहिती प्राप्त झाली असून, ती अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे संपूर्ण आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून कंपनीशी सतत संपर्क साधला जात आहे

तसेच, १२ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या कंपनीच्या ई-मेल संदेशानुसार, सन २०२४-२५ मधील आंबिया बहार अंतर्गत उर्वरित महसूल मंडळांच्या दाव्यांची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. हवामान डेटा, WINDS प्रणालीतील मॅपिंग, AWS डेटा, BWS उपलब्धता इत्यादी तांत्रिक आवश्यकतेनुसार पात्र दावे निकाली काढण्याचे काम सुरू आहे.

भारतीय कृषि विमा कंपनीने स्पष्ट केले आहे की, सर्व पात्र शेतकऱ्यांचे दावे दिवाळीपूर्वी निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.