भुसावळ रेल्वे स्थानकावर जप्त केल्या नकली एक कोटी रुपयांच्या नोटा
जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली असून यामध्ये रेल्वे पोलिसांनी एका संशयिताकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.
मलकापूरहून भुसावळला आलेले दोन संशयित रेल्वे स्थानकावर उतरल्यावर रेल्वे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. तपासणी दरम्यान, त्यांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या बंडलमध्ये ‘चिल्ड्रन बँक’ लिहिलेल्या नकली नोटा आढळून आल्या आहेत.
तपासणी सुरू असताना एक संशयित फरार झाला असून, दुसऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटा बंडलमध्ये केवळ वरची नोट खरी दिसत होती, तर बाकी सर्व नोटा नकली होत्या. त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात चलन फसवणुकीचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भुसावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.