मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेना मोठा धक्का, आणखी एक महत्वाचा निर्णय रद्द
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय फडणवीस यांनी रद्द केला. या निर्णयामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना देखील झटका बसला आहे. प्रहार जनशक्तीच्या मुंबईतल्या मंत्रालयाजवळच्या कार्यालयाची जागा जनता दल सेक्युलरला देण्यात आली.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. मंत्रालयाजवळ जीवन बिमा मार्ग येथे ९०९ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती.
त्यातील फक्त २०० चौरस फूट जागा शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी ७०० चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. पण आता बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन महायुतीसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना सरकारकडून दणका देण्यात आला आहे. तर बिहारमध्ये भाजपसोबत मित्र पक्ष म्हणून राहिलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा देण्यात आली आहे. यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.