भुसावळात २.१० लाखांच्या ३ गाड्या जप्त, दोन सराईत आरोपी जेरबंद

0

भुसावळ शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. या धडाकेबाज कारवाईत चोरीस गेलेल्या तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चोरट्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दिनांक ६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. इराणी मोहल्ला परिसरातील रजा टॉवरजवळ काही संशयास्पद दुचाकी उभ्या असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तपासणीदरम्यान तेथे तीन महागड्या दुचाकी आढळून आल्या.

या गाड्यांच्या मालकांचा शोध घेतला असता कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये आणून इंजिन आणि चेसिस नंबरची पडताळणी केली. त्यावेळी या गाड्या मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर (तोफखाना) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक चौकशीत हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी आणि सलमान अली हुजूर अली इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) यांनी या दुचाकी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.

या कारवाईत पल्सर १२५, बजाज पल्सर N-160 आणि KTM Duke 250 या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे २.१० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आरोपींकडून आणखी चोरीच्या घटनांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेंद्र रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बावचळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.