10 चोरीच्या मोटारसायकलीसह तिघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव । जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच 10 चोरीच्या मोटारसायकलीसह तिघा चोरट्यांच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. विशाल गोपाल भोई (रा.टाकरखेडा, ता.जामनेर), देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, सुरज अशोक पारधी (साळुंखे, टाकरखेडा, ता.जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विशाल गोपाल भोई हा चोरीची मोटरसायकल वापरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील यांना कळाल्यानंतर पथक त्याच्या मागावर होते. पोलीस पथकाने त्याला अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने त्याचे दोघे साथीदार देवानंद उर्फ आनंद सुरडकर आणि सुरज अशोक पारधी यांची नावे सांगितल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या ताब्यातून चार लाख 33 हजार रुपये किंमतीच्या 10 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
आरोपींच्या ताब्यातून एमआयडीसी हद्दीतून चोरलेल्या पाच, भुसावळ शहर हद्दीतून चोरलेली एक तसेच जळगाव शहर व जिल्हापेठ हद्दीतून चोरलेली एक अशा आठ दुचाकी तसेच अन्य दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन दुचाकींबाबत आरटीओ प्रशासनाकडून चेसीस व इंजिन क्रमांकाची माहिती मागवण्यात आली असून त्यानंतर या दुचाकींबाबत उलगडा होणार आहे.