धुळ्यात एसटी बसवर 10 ते 12 जणांकडून दगडफेक

0

धुळे । राज्यभरात परभणीच्या घटनेत पडसाद आता उमटताना दिसत आहेत. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या प्रकरणावरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. मात्र याच दरम्यान धुळ्यात एसटी बसवर 10 ते 12 जणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना आज घडली आहे.

काय आहे घटना?
धुळे शहरातील दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेत बसमधील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही, असे बस चालकाने सांगितले आहे.

एसटी बसने धुळ्यात प्रवेश केल्यानंतर ही घटना घडली. दसरा मैदान परिसरात आठ ते दहा अज्ञात तरुणांनी या बसवर अचानक दगडफेक सुरू केली. बस चालकाने तत्काळ बस थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, दगडफेक का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परभणी प्रकरणाचे पडसाद असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून दगडफेकीबाबतचा तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.