ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन
मुंबई । बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरल्या होत्या. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता त्यांचं पार्थिव विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आलं. देओल कुटुंबीयांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत.


धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा येथील आर्य हायस्कूलमध्ये झालं. धर्मेंद्रंचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं, त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी नोकरी सोडली आणि फिल्मफेअरच्या स्पर्धेत सहभाग घेतला. धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जायचे. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली.
त्यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. याशिवाय त्यांच्या ‘फूल और पत्थर’, ‘यादों की बारात’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘नौकर बिवी का’, ‘बेताब’, ‘घायल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. २५ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. २०१२ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.