धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दुध तयार करणाऱ्याला अटक ; परिसरात खळबळ

0

धरणगाव- तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून दुध तयार करून विकणाऱ्याला अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमनाथ आनंदा माळी ( वय 31 ) असे या आरोपीचे नाव आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे सोमनाथ आनंदा माळी हा तरूण आरोग्यास अतिशय अपायकारक असलेल्या केमिकल्सचा वापर करून दुध तयार करून ते विकत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर आत्माराम साळुंखे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून त्यांनी धरणगाव पोलीस स्थानकाला याबाबतची माहिती दिली. यावरून पोलीस निरिक्षकांनी त्यांना आपले सहकारी कार्यवाहीसाठी दिले.

या पथकात पोलीस उपनिरिक्षक संतोष पवार, हवालदार वर्षा गायकवाड तसेच धरणगाव पोलीस स्थानकात हजर असलेले व एलसीबी जळगाव येथे कार्यरत असणारे उपनिरिक्षक जित्ोंद्र वलटे, हवालदार रवींद्र पाटील, दीपक माळी, विष्णू बिऱ्हाडे व बाबासाहेब पाटील यांच्यासह दोन पंचांचा समावेश होता. या पथकाने भवरखेडा येथे जाऊन सोमनाथ आनंदा माळी याच्या घरी छापा मारला. यात त्याच्या घरी भेसळयुक्त दुध तयार करणारी सामग्री आढळून आली. यात रसायनांसह उपकरणांचा समावेश होता. आपण भेसळयुक्त दुध तयार करून ते विकत असल्याची कबुली सोमनाथ माळी याने दिली.

या अनुषंगाने सोमनाथ माळी याला अटक करण्यात आली असून अन्न सुरक्षा अधिकारी किशोर आत्माराम साळुंखे यांनी धरणगाव पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली. यानुसार, सोमनाथ माळीच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.