रावेर पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाखांच्या दरोड्याप्रकरणी ७ जण जेरबंद

0

रावेर । बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीच्या रावेर गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली दरम्यान, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

६ फेब्रुवारी २०२६ रोजी बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ व तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर व रावेर परिसरात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे ९ वाजता खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ जणांच्या टोळीने त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी रावेरमधील बंडू चौक परिसरातून सात संशयितांना ताब्यात घेतले. फारुख शेख रईस, अत्ताउल्लाह खान दाउद खान ऊर्फ सोनू, शेख सईद शेख कादर सुपडू, शेख समीर शेख कलीम ऊर्फ विकू, राहील खान दाउद खान, रहेमान खान अय्युब खान ऊर्फ मुन्या, अक्रम खान इस्माईल खान सर्व रा. बंडू चौक, रावेर असं अटक केलेल्या ७ संशयितांची नावं आहे.

आरोपींकडून २ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम तसेच ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस आणि सायबर पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.