जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड

0
जळगाव । जळगाव शहरात एकाच रात्रीत दोन बंद वाईन शॉपचे शटर तोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे. रामनिवस मंजू गुप्ता (रा. कल्याण, जि. ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून रोख २ लाख ४ हजार रुपये व दुचाकी हस्तगत केली आहे.
जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील प्रिन्स वाईन शॉप आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील राज वाईन्स या दोन वाईन शॉप फोडून रामनिवास गुप्ता याने रोकड चोरुन नेली होती.  या प्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. कारवाईदरम्यान चोरीतील तब्बल ३ लाख ४ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अनेक शहरांत गुन्हे दाखल
अटकेतील रामनिवस गुप्ता याच्याविरुद्ध ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नालासोपारा, पुणे शहर आदी ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास पोहेकॉ भगवान चौधरी करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.